Ad will apear here
Next
सैर ऐतिहासिक झाशीची...
राणीमहाल

१८ जून हा झाशीची राणी लक्ष्मीबाईचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘करू या देशाटन’ या सदरात माहिती घेऊ या झाशीची...
.................
रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली!!

कविवर्य भा. रा. तांबे यांनी केलेलं हे झाशीचं वर्णन. झाशी म्हटले, की आपल्याला हमखास आठवते ती झाशीची शूरवीर राणी... तिच्या कर्तृत्वामुळेच झाशी आणि महाराष्ट्राचे नाते अतूट आहे.

दुसरे बाजीराव पेशवे बुंदेलखंडात असताना साताऱ्याजवळील धावडशी येथील मोरोपंत तांबे पत्नी भागीरथीबाई यांच्यासह ब्रह्मावर्तामध्ये त्यांच्या सेवेसाठी गेले. (हे तांबे घराणे मूळचे रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोलधे येथील.) या दाम्पत्याला १९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी येथे कन्यारत्न झाले. तिचे नाव मनकर्णिका ऊर्फ मनू. ती बाजीरावांची अतिशय लाडकी होती. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनी मनूला युद्धशास्त्रात तरबेज केले. बाळंभट देवधर यांनीच मल्लखांबाचा खेळ शोधून काढला. पुढे झाशी संस्थानाचे अधिपती गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी मनूचा विवाह झाला आणि मनूची लक्ष्मीबाई झाली. (हे नेवाळकर घराणे मूळचे रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोट या गावचे.) पूर्वी हे गाव बलवंतनगर या नावाने ओळखले जायचे. महाभारतातील चेदी वंशाचे (जयद्रथ) येथे राज्य होते.

चौदाव्या शतकात राजा वीरसिंह देव या ओर्च्छाच्या राजाने झाशीत किल्ला बांधला. राजाला समोरच्या पर्वतावर सावली (छाया) दिसली आणि तो ‘झॉई सी’ असे बुंदेली भाषेत म्हणाला. तेव्हापासून झाशी हे नाव रूढ झाले, असे म्हटले जाते. १७व्या शतकात बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल यांनी बाजीरावांना मदतीसाठी बोलावले, त्या वेळी हा प्रदेश मराठ्यांकडे सुपूर्द केला. तेव्हा बाजीरावांनी नारोशंकर यांना सुभेदार नेमले. नारोशंकर होळकरांकडे आले आणि इ. स. १७३५पासून त्यांची चाकरी करू लागले. एक लढाऊ शिपाई म्हणून होळकरांनी नारोशंकरांची पेशव्यांकडे शिफारस केली. बाजीराव पेशव्यांच्या आदेशावरून नारोशंकर यांनी ओडिशाकडे कूच केले. वाटेत टिकमगड जिल्ह्यातील ओरछाच्या राजाचे नारोशंकरांशी भांडण झाले, तेव्हा त्यांनी ओरछाच्या राजाकडून अठरा लाख रुपयांचा खजिना मिळवून पेशव्यांना आणून दिला. बाजीराव पेशव्यांनी नारोशंकरांना ओरछाचा व इंदूरचा सुभेदार केले. इ. स. १७४२मध्ये पेशव्यांनी त्यांना राजेबहाद्दूर हा किताब दिला. नारोशंकरांना पेशव्यांनी दुसऱ्या कामगिरीसाठी बोलावून घेतले व झाशी नेवाळकरांकडे सोपविली. १७६६मध्ये विश्वासराव नेवाळकर सुभेदार झाले. त्यांच्याच काळात महालक्ष्मी मंदिर आणि रघुनाथ मंदिर बांधले गेले. गंगाधरराव यांच्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे.

झाशीतील ऐतिहासिक ठिकाणे

राणीमहाल :
हा दुमजली महाल रघुनाथराव यांनी बांधला. या महालातूनच राणी लक्ष्मीबाईंनी तात्या टोपे यांच्या साह्याने लढ्याची सूत्रे हलविली.

झाशीचा किल्ला : हा किल्ला इ. स. १६१३मध्ये ओर्च्छाच्या राजाने बांधला. किल्ल्यात रानी झांसी गार्डन, शिवमंदिर आहे. तसेच राणीचे तोफखानाप्रमुख गुलाम गौस खान आणि मोतीबाई व खुदाबक्ष यांची कबर आहे. हे तिघेही राणीचे विश्वासू सेवक होते.

संग्रहालयसंग्रहालय : झाशीच्या किल्ल्यातच संग्रहालय असून, त्यात १२व्या शतकातील मूर्तीही आहेत. बुंदेलखंडाची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या अनेक वस्तू येथे आहेत. चंदेल राज्यांची शस्त्रास्त्रे, त्यांची वस्त्रे-पेहरावही बघण्यास मिळतात.

महालक्ष्मी मंदिर : मनकर्णिका आणि गंगाधरराव यांचा विवाह महालक्ष्मी मंदिरात झाला. हे झाशीच्या राजघराण्याचे कुलदैवत आहे.

करगुंवाजी मंदिर :
झाशीपासून पाच किलोमीटर अंतरावर, सध्याच्या मेडिकल कॉलेजजवळ हे जैन मंदिर आहे. ते सातशे वर्षे जुने आहे. त्याशिवाय झाशीमध्ये गणेश मंदिर आणि रघुनाथ मंदिरही आहे. झाशीत अनेक शैक्षणिक संस्था, तसेच कृषी संशोधन केंद्रही आहे.

दतिया : झाशीपासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर दतिया आहे. झाशी, शिवपुरी, ग्वाल्हेर, ओरछा, खजुराहो अशी सात दिवसांची छान सहल करता येते.

गोविंद महालवीरसिंह महाल : दतियाचा हा सातमजली महाल गोविंद महाल म्हणूनही ओळखला जातो. त्याला ४४० खोल्या आणि सात मजले आहेत. सलीम जहांगीरचा मांडलिक राजा बीरसिंह देव याने १६१४मध्ये जहांगीरच्या स्वागतासाठी दतिया महाल बांधला; पण येथे जहांगीर आला नाही. तसेच कोणत्याही राजाने राहण्यासाठी तो वापरला नाही. एका उंच टेकडीवर हा महाल दिमाखात उभा आहे. त्याचे संपूर्ण बांधकाम दगड व विटांचे असून, कोठेही लोखंड व लाकडाचा वापर केलेला नाही. याचे दोन मजले जमिनीखाली तळघर स्वरूपात आहेत, तर पाच मजले जमिनीवर आहेत. त्यातील चित्रे जैविक रंगांचा वापर करून रंगविलेली आहेत. या बांधकामावर मुघल व राजपुताना शैलीचा प्रभाव आहे. लघु वृंदावन, अवध बिहारी मंदिर, शिवगिरी मंदिर, विजय राघव मंदिर, गोविंद मंदिर आणि बिहारीजी मंदिर अशी मंदिरेही येथे आहेत.

सोनगिरीची जैन मंदिरे :
दतियापासून १५ किलोमीटर अंतरावर सोनगिरी हे ठिकाण आहे. तेथे इ. स. ९०० ते इ. स. १००० या कालावधीत दोन टेकड्यांवर ७७ जैन मंदिरे उभारली गेली. ५७ क्रमांकाच्या मंदिरामध्ये चंद्रप्रभूची ११ फूट उंचीची मूर्ती आहे. हे मंदिर मुख्य मंदिर समजले जाते. तसेच सोनगिरी गावामध्ये २६ मंदिरे आहेत. जैनांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू येथे सुमारे १७ वेळा येऊन गेले आहेत. ही अतिशय देखणी अशी मंदिरे आहेत.

आजूबाजूची ठिकाणे :
गोविंद महाल
उनाव : येथे ४०० वर्षांपूर्वीचे बालाजी मंदिर असून, ते झाशीपासून १५ किलोमीटरवर आहे.

बडोनी : हे ठिकाण दतियापासून १० किलोमीटरवर असून, तेथे बुंदेली शैलीतील इमारती, तसेच गुप्तकालीन बौद्ध व जैन मंदिरे आहेत.

देवगड : झाशीपासून १२३ किलोमीटरवर ललितपूर जिल्ह्यात हे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथील किल्ल्यात दहाव्या शतकातील ३१ जैन मंदिरे आहेत. तेथे संग्रहालयही असून, त्यात अनेक शिल्पे ठेवण्यात आली आहेत.

भांडेर : महाभारतात याचा उल्लेख भांडकपूर असा आहे. तेथे एक पुरातन किल्ला असून, सोनतलैया आणि लक्ष्मण मंदिर बघण्यासारखे आहे.

सनकुआ : दतियापासून ७० किलोमीटरवर हा धबधबा आहे.

कसे जाता येईल?
झाशी व परिसर फिरण्यासाठी मुख्यत्वेकरून रेल्वेने जाणे सोयीस्कर आहे. हे ठिकाण मुंबई, नागपूर, पुणे, चेन्नई, गोवा अशा सर्व प्रमुख शहरांशी रेल्वेने जोडले गेलेले आहे. १२ ए, २५, २६, ७५ आणि ७६ हे पाच राष्ट्रीय महामार्ग झाशीच्या जवळून जातात. झाशीत लष्कराचा विमानतळ आहे; पण तो प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध नाही. झाशीला जाण्यासाठी जवळचा विमानतळ ग्वाल्हेर येथे आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत.)

सोनगिरीची जैन मंदिरे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BYWVCN
 Madhavji khupach sundar varnan n vivechan. Great efforts taken. Hats off!!2
Neeraj Raj Absolutely.
 अतिशय छान माहिती . प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा होते आपल्या वर्णनामुळे . धन्यवाद .1
 Khupach sundar1
 मी 3 वर्ष झाशीला होतो आर्मीमध्ये असताना. खूप छान स्थळ आहे.
माहीती छान आहे.1
Similar Posts
वास्तुसौंदर्याचा खजिना : ओरछा नगरी मध्य प्रदेशातील एकाहून एक सरस ठिकाणांची सैर आपण सध्या ‘करू या देशाटन’च्या माध्यमातून करत आहोत. गेल्या वेळी आपण ग्वाल्हेरमध्ये फेरफटका मारला. आजच्या भागात फिरू या ओरछा नगरीमध्ये.
चंदेरी गावात फेरफटका ‘करू या देशाटन’मध्ये आपण गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील ओरछा नगरीमध्ये सैर केली. आज सहल करू या नावाप्रमाणेच असलेल्या चंदेरी या ठिकाणी...
शिंदेशाही शिवपुरी ‘करू या देशाटन’ सदरात या वेळी फेरफटका मारू या मध्य प्रदेशातील शिवपुरी आणि आजूबाजूच्या पर्यटनस्थळांवर....
शिंदेशाही ग्वाल्हेर ‘करू या देशाटन’च्या गेल्या भागात आपण शिंदेशाही शिवपुरीची माहिती घेतली. या वेळी जाणून घेऊ या शिंदेशाही ग्वाल्हेरबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language